सहा वर्षांनंतर मांडगावात स्ट्रीट लाईट सुरू : गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला
सहा वर्षांनंतर मांडगावात स्ट्रीट लाईट सुरू : गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला

समुद्रपूर : प्रतिनिधी
मांडगाव येथील बस स्थानक चौक ते प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नर्सिंग कॉलेजपर्यंत बसविण्यात आलेले स्ट्रीट लाईट अखेर सहा वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शनिवार, दि. 21 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाले. या बहुप्रतीक्षित कामामुळे संपूर्ण गाव प्रकाशात न्हाऊन निघाले असून गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
या यशामागे अनेक कार्यकर्ते व अधिकाऱ्यांचे योगदान आहे. गावातील काही कार्यकर्त्यांनी माननीय खासदार साहेबांना निवेदन दिले होते. तसेच सन्माननीय राज्यमंत्री पंकज भाऊ भोयर यांना सुधीरबाबू कोठारी व हिम्मतराव चतुर यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले होते. याचा सकारात्मक परिणाम या कामाला झाला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रिक मीटर मिळवण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य सुनील भाऊ डुकरे व प्रमोद भाऊ डफ यांचे सहकार्य लाभले. यासोबतच ग्रामपंचायत अधिकारी थूल साहेब व कनिष्ठ अभियंता वानी साहेब यांच्या विशेष सहकार्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन अखेर स्ट्रीट लाईट सुरू झाले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ता हेमंत पाहुणे व सहकाऱ्यांनी जनरेटरद्वारे लाईट सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते. काम वेळेत न झाल्यास हेमंत पाहुणे व माजी पंचायत समिती सदस्य सुनील भाऊ डुकरे यांनी उपोषणाचा इशाराही दिला होता. मात्र त्याआधीच संबंधित अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत काम पूर्ण केले.
स्ट्रीट लाईट सुरू होताच गावकऱ्यांनी ग्रामसेवक थूल साहेब, अभियंता वानी साहेब, इलेक्ट्रिशियन प्रशांत जीवातोडे तसेच विशेष प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ता हेमंत पाहुणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. वाजंत्री व जल्लोषात कार्यक्रम पार पडला.
यावेळी हेमंत पाहुणे, बाजार समिती संचालक, माजी पंचायत समिती सदस्य सुनील भाऊ डुकरे, राजूभाऊ निमजे, प्रमोद भाऊ डफ, नामदेव तडस, गजानन पाहुणे, प्रमोद चन्ने, राजू मेंढे, मोरू चामडे, राजू चुटे, संजय लाखे, रवींद्र जोहारी, सौरभ डफ, लक्ष्मण भगत, पोलिस पाटील गणेश तडस, तुपेश चमडे तसेच इतर अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.






