पीएम किसानच्या प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करा
पीएम किसानच्या प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करा

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ग्रामपंचायतीनिहाय बैठक घेण्याचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
समुद्रपूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ तांत्रिक अडचणी आणि प्रलंबित प्रकरणांमुळे अनेक शेतकऱ्यांना मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी त्वरित कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी जिल्हाधिकारी (आरडीसी) राजू रणवीर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
वर्धा जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने सुमारे १५ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे पीएम किसान योजनेतील प्रलंबित प्रकरणांबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी जिल्हाधिकारी यांच्या दालनात यासंदर्भात विशेष बैठक घेण्यात आली.
बैठकीत कृषी विभागाच्या जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांकडून पीएम किसान योजनेचा आढावा घेण्यात आला. अनेक शेतकऱ्यांना सन २०२२ पासून सन्मान निधीचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या. शेतकरी तालुका व जिल्हा कृषी कार्यालयात वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
ग्रामपंचायतीनिहाय बैठक घेण्याचे निर्देश
प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीस सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तसेच कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेतील अडचणींची ग्रामपंचायतीनिहाय माहिती संकलित करून त्यावर कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले.
या कार्यवाहीचा अहवाल ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही आरडीसी राजू रणवीर यांनी दिले. यासंदर्भात त्यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तसेच कृषी विभागाचे आयुक्त, पुणे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
बैठकीस कृषी विभागाचे जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी तसेच वर्धा जिल्हा सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष राजेश सावरकर, जिल्हा उपाध्यक्ष मुरलीधर चौधरी, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विलास, वर्धा तालुकाध्यक्ष कीर्ती सवाई, संजय शेलुकर, रमेश ढाले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.






