शिक्षण-प्रशिक्षण

महिमाची वैद्यकीय शिक्षणाकडे झेप; एदलाबाद शाळेत गुणगौरव


महिमाची वैद्यकीय शिक्षणाकडे झेप; एदलाबाद शाळेत गुणगौरव

GMC आंबेजोगाई येथे MBBS प्रवेशासाठी निवड; माजी विद्यार्थिनीच्या यशाचा शाळेत गौरव

गिरड : एदलाबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची माजी विद्यार्थिनी कु. महिमा परमहंस चौधरी हिची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबेजोगाई (GMC) येथे MBBS अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती, एदलाबाद यांच्या वतीने तिचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.

ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणात प्रवेश मिळविल्याने शाळेसह एदलाबाद गावाच्या शैक्षणिक अभिमानात भर पडली आहे. माजी विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जपण्याची शाळेची परंपराही या कार्यक्रमातून अधोरेखित झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अविनाश राऊत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य इस्राईल शेख, माजी मुख्याध्यापिका तथा सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सौ. मायाताई चाफले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकरराव चाफले, एदलाबाद शाळेचे माजी शिक्षक अंकुश पाटील, पोलीस पाटील सागर वाघाडे, विकास विद्यालय गिरडचे प्राचार्य सोनकुसरे, ज्येष्ठ शिक्षक उमेश वाणी, समता शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष सुनील तेलतुंबडे, प्रा. प्रदीप लोहकरे, जि.प. कर्मचारी बँक वर्धाचे संचालक सचिन शंभरकर, शिक्षक देवेंद्र सातपुते, पत्रकार अब्दुल कबीर आणि मुनरूद्दीन काझी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी महिमाच्या यशाचे कौतुक करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी महिमाचे यश प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर उराडे, सहशिक्षक चंद्रकांत उमाटे आणि शाळा व्यवस्थापन समितीने परिश्रम घेतले. सूत्रसंचालन चंद्रकांत उमाटे यांनी केले. उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था श्री. सुमित चौधरी यांच्या सौजन्याने करण्यात आली. ही जबाबदारी देविदास बोंबले, वनिताताई ठाकरे, छायाताई ठाकरे आणि प्रांजली चौधरी यांनी पार पाडली.

पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली. ‘विद्यार्थ्यांचे यश हेच शाळेचे खरे वैभव’ या भावनेतून माजी विद्यार्थिनीच्या यशाचा केलेला गौरव शाळेच्या आपुलकीच्या आणि ऋणानुबंधांच्या परंपरेचा आदर्श ठरला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *