वनविभाग

पवनगाव परिसरातील हल्लेखोर वाघीण अखेर जेरबंद , १८ दिवसांनी वनविभागाला यश


पवनगाव परिसरातील हल्लेखोर वाघीण अखेर जेरबंद

१८ दिवसांनी वनविभागाला यश; शेतकऱ्यांनी घेतला सुटकेचा निःश्वास, आमदार कुणावार घटनास्थळी 

समुद्रपूर / प्रतिनिधी

समुद्रपूर तालुक्यातील पवनगाव (करूळ) परिसरात गेल्या १८ दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या हल्लेखोर वाघिणीला अखेर वनविभागाने जेरबंद केले. सोमवारी (२९) पहाटे साडेपाचच्या सुमारास वनविभागाच्या पथकाला वाघीण पकडण्यात यश आले. त्यामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

८ सप्टेंबर रोजी पवनगाव येथील विशाल मून यांच्यावर वाघिणीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर ९ सप्टेंबरला शेतपिकांच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या दोघांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. सलग घटनांमुळे पवनगावसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्लेखोर वाघिणीला तातडीने जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होत होती.

दरम्यान, आमदार समीर कुणावार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून वाघिणीला पकडण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. परवानगी मिळाल्यानंतर वनविभागाने युद्धपातळीवर शोधमोहीम राबविली. उपवनसंरक्षक हरविर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक हरीष सरोदे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल ढोणे यांच्या नेतृत्वात पथकाने सातत्याने प्रयत्न केले.

वाघीण जेरबंद झाल्याची माहिती मिळताच आमदार समीर कुणावार यांनी पवनगाव गाठून घटनास्थळी वनविभागाच्या पथकाची भेट घेतली आणि त्यांच्या कामाचे कौतुक करून अभिनंदन केले.

या मोहिमेत मानद वन्यजीव रक्षक कौस्तुभ गावंडे, प्रणव जोशी, डॉ. मेघराज तुलावी, प्रणित सुर, अभिषेक खेडुलकर, पीपल्स फॉर ॲनिमल्स वर्धा, क्षेत्रसहाय्यक चौधरी, क्षेत्रसहाय्यक डेहनकर, वनरक्षक हिवरकर, लोमेश गोहन, पिसे, रमेश चौके, समीर वाघ, शशिकांत शेंदरे, पटेल, वादले, रोशन उईके, रोशन कुत्तमारे यांच्यासह आरआरटी आणि समुद्रपूर वनपरिक्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले.

 

दुसऱ्या वाघाचे आव्हान कायम

पवनगाव परिसरात आणखी एका वाघाचा वावर असल्याने वनविभागासमोरील आव्हान अद्याप कायम आहे. या वाघाचाही बंदोबस्त करून परिसरातील नागरिकांना सुरक्षितता मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *