गिरड येथे रक्षाबंधन स्नेहमिलन सोहळा उत्साहात
गिरड येथे रक्षाबंधन स्नेहमिलन सोहळा उत्साहात

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या विचारांचा जागर
गिरड : रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून समाज, गाव, संस्कृती आणि मातृ-भगिनींच्या रक्षणाचा संकल्प आहे, या विचारातून श्री गुरुदेव सेवा मंडळ, गिरड यांच्या वतीने रक्षाबंधन स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी (१) श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर येथे हा सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या संचालिका सौ. रेखाताई र. डरे होत्या. ग्रामविकास अधिकारी प्रवीणजी बालमवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी सरपंच राजूजी नौकरकर, ठाणेदार विकासजी गायकवाड, ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक पुरुषोत्तमजी थुटे, श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष बलवंतजी गाठे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राकेशजी चंदनखेडे, अनुसया माता महिला भजन मंडळाच्या अध्यक्ष अनिताताई दरणे, माजी जिल्हा परिषद सदस्य फकीराजी खडसे, मोहगावचे सरपंच तथा पत्रकार विलासजी नवघरे, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका भारतीताई ढगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘गुरुदेव हमारा प्यारा है…’ या संकल्पगीताने वातावरण भक्तिमय झाले. प्रास्ताविक श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष विष्णूजी ब्राह्मणवाडे यांनी केले. यावेळी मान्यवरांनी रक्षाबंधनाचे सामाजिक महत्त्व, ग्रामरक्षण आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सर्वधर्म समभावाच्या विचारांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास गिरड परिसरातील महिला व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे प्रचारक मंथन भांदक्कर, वैभव अंड्रसकर, गौरव कावळे, साहिल सोनवणे, भावेश ब्राह्मणवाडे, अथर्व शिवणकर, वेदायु लाजूरकर, श्लोक मिसाळ यांच्यासह महिला कार्यकर्त्या व समस्त उपासकांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन पूजाताई अग्निहोत्री यांनी केले. आभार अर्चनाताई बारवकर यांनी मानले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.






