सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या अंगणवाडीतील चिमुकल्यांचा गौरव
सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या अंगणवाडीतील चिमुकल्यांचा गौरव

समुद्रपूर तालुक्यातील मोहगांव येथील जिल्हा परिषद शाळेत २६ जानेवारी रोजी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अंगणवाडीतील सात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध देशभक्तीपर गाण्यांवर उत्कृष्ट नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या उल्लेखनीय सादरीकरणाबद्दल मोहगांव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात चिमुकल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. या वेळी सरपंच विलास नवघरे, ग्रामसेवक अखिल ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रणालीताई वांढरे व सुनिता वाघाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
मार्गदर्शन करताना सरपंच विलास नवघरे म्हणाले की, २६ जानेवारीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लहान वयातच मंचावर आत्मविश्वासाने आपले कलागुण सादर केले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला नवी दिशा मिळते. विद्यार्थ्यांना या सादरीकरणासाठी तयार करणाऱ्या अंगणवाडी सेविका छायाताई औरके यांनी घेतलेल्या मेहनतीचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमास कैलास नवघरे, उत्तमराव वांढरे, अनुप निस्ताने, अरुण ठाकरे यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






