शिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

प्राचार्य मेघश्याम ढाकरे राष्ट्रीय शिक्षण गौरव पुरस्काराने सन्मानित बालरक्षक प्रतिष्ठानतर्फे गुणगौरव; गुजरातमधील आनंद येथे सोहळा


प्राचार्य मेघश्याम ढाकरे राष्ट्रीय शिक्षण गौरव पुरस्काराने सन्मानित  

तालुका प्रतिनिधी | समुद्रपूर : विद्या विकास महाविद्यालय, समुद्रपूरचे प्राचार्य मेघश्याम ढाकरे यांना शिक्षण, समाजसेवा, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय शिक्षण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण व समाजसेवा क्षेत्रात कार्यरत बालरक्षक प्रतिष्ठानतर्फे ४ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील आनंद येथील भानुभाई आय. पटेल अलीकॉन हॉलमध्ये पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार, चषक व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. भरत मेहता, डॉ. निशा जोशी, श्रीश्री मोरारिदासजी महाराज, आर. के. मंडालिया, प्रा. डॉ. मेघना व्यास, जिल्हा शिक्षण अधिकारी कामिनीबेन त्रिवेदी, उपजिल्हा शिक्षण अधिकारी डॉ. तेजेंद्रसिंह सोळंकी आणि कलाकार-कवी डॉ. संजय मालवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य ढाकरे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षकांची समाज घडविण्यातील भूमिका स्पष्ट केली. बालरक्षक प्रतिष्ठानच्या शिक्षण व बालकल्याण क्षेत्रातील कार्याचेही कौतुक करण्यात आले.

पुरस्काराबद्दल बालरक्षक प्रतिष्ठानचे पदाधिकारी नरेशभाई वाघ, मनोजभाई चिंचोरे, स्मिता राणा, धर्मेशभाई जोशी तसेच विद्या विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. उमेश तुळसकर, सचिव डॉ. नयना तुळसकर, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्राचार्य मेघश्याम ढाकरे यांचे अभिनंदन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *