वन्यजीवांच्या संवर्धनासाठी १० हेक्टरवर गवत कुरण लागवड, गिरड व्याघ्र सफारी प्रकल्पात श्रमदानातून उपक्रम
वन्यजीव संवर्धनासाठी १० हेक्टरवर गवत कुरण लागवड
गिरड व्याघ्र सफारी प्रकल्पात श्रमदानातून उपक्रम

गिरड : वन्यजीवांचे संरक्षण, जंगलातील जैवविविधतेचे संवर्धन, नैसर्गिक गवताळ अधिवासाची पुनर्निर्मिती तसेच जल व मृदासंधारणाला चालना देण्याच्या उद्देशाने गिरड व्याघ्र सफारी प्रकल्पांतर्गत गिरड बीटातील कक्ष क्रमांक ३१५ राखीव वनात मंगळवारी (दि. ८) १० हेक्टर क्षेत्रावर श्रमदानातून गवत कुरण लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. वन विभागाच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात वन अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सध्या विदर्भातील अनेक वनक्षेत्रांमध्ये उन्हाळ्यात नैसर्गिक गवताचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे शाकाहारी वन्यजीवांना पुरेसा चारा मिळण्यात अडचणी निर्माण होतात. याचा परिणाम अन्नसाखळीवर होऊन व्याघ्र, बिबट यांसारख्या मांसाहारी प्राण्यांच्या अधिवासावरही होतो. ही बाब लक्षात घेऊन गिरड व्याघ्र सफारी परिसरात नैसर्गिक गवताळ कुरण विकसित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
यावेळी गिरडचे सरपंच राजू नौकरकर, मोहगावचे सरपंच विलास नवघरे, सहाय्यक उपवनसंरक्षक (वर्धा) श्री. सरोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल ढोणे, गिरडचे क्षेत्र सहाय्यक गणेश राऊत, कोरा येथील क्षेत्र सहाय्यक विकास चौधरी,समुद्रपूरचे क्षेत्र सहाय्यक राजेंद्र धनवीज, मंगरूळचे क्षेत्र सहाय्यक सुनील डेहनकर, वनरक्षक पी. डी. बेले, व्यवस्थापन समिती खुर्सापारचे अध्यक्ष सदाशिव राऊत तसेच वन व्यवस्थापन समिती शिवणफळचे अध्यक्ष गजानन गारगाटे उपस्थित होते. याशिवाय वन कर्मचारी, वनमजूर, रोपण चौकीदार, आर.आर.टी. पथक आणि परिसरातील ग्रामस्थांनी श्रमदान करून उपक्रम यशस्वी केला.
या उपक्रमात घोन्याड, मोती तुरा, बेर, मोठी डोंगरी, लहान डोंगरी, मोशन आणि रान शेवरा या गवताच्या विविध प्रजातींच्या एकूण ७३ किलो बियाण्यांची पेरणी करण्यात आली. या प्रजातींचे गवत जलद वाढणारे, मृदेला घट्ट पकडून ठेवणारे आणि वन्यजीवांसाठी पौष्टिक चाऱ्याचे महत्त्वपूर्ण स्रोत मानले जाते. यामुळे हरिण, सांबर, चितळ, नीलगाय, रानससे यांसारख्या शाकाहारी वन्यजीवांना नैसर्गिक अधिवासात पुरेसा चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
गवत कुरणांच्या विकासामुळे पावसाचे पाणी जमिनीत अधिक प्रमाणात मुरते, मृदा धूप कमी होते, भूजल पातळी वाढण्यास मदत होते आणि जंगलातील नैसर्गिक परिसंस्था अधिक सक्षम बनते. तसेच गवताळ क्षेत्रामुळे वनातील आगीचा धोका कमी होण्यास, विविध पक्षी, कीटक आणि लहान वन्यजीवांना आश्रय मिळण्यासही मदत होते. त्यामुळे जल, जंगल आणि जैवविविधता संवर्धनासाठी अशा उपक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
वन विभागाने राबविलेल्या या श्रमदान उपक्रमामुळे “लोकसहभागातून वनसंवर्धन” ही संकल्पना अधिक बळकट झाली असून, पर्यावरण संरक्षणात ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. गिरड व्याघ्र सफारी परिसरात विकसित होणारे हे गवत कुरण भविष्यात वन्यजीवांसाठी सुरक्षित, समृद्ध आणि शाश्वत अधिवास निर्माण करण्यास उपयुक्त ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.






