महाराष्ट्रसामाजिक

महाराष्ट्र धर्मच देशाच्या विस्कटलेल्या व्यवस्थेला सुधारेल : कवी नितीन चंदनशिवे


महाराष्ट्र धर्मच देशाच्या विस्कटलेल्या व्यवस्थेला सुधारेल : कवी नितीन चंदनशिवे

समुद्रपूर : प्रतिनिधी

धर्म आणि जातीच्या नावावर समाजात फूट पाडण्याचे राजकारण युवकांनी नाकारले असून, संवाद, सहिष्णुता, समता आणि माणुसकीची मूल्ये जपणारा महाराष्ट्र धर्म हा आजच्या देशातील विस्कटलेल्या सामाजिक व्यवस्थेला नव्याने दिशा देऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी तथा वक्ते नितीन चंदनशिवे यांनी केले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समुद्रपूर येथील गोविंद सभागृहात आयोजित ‘महाराष्ट्र धर्म जागर’ कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अशोक शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश झोटिंग, काँग्रेसचे गुणवंत कोटमकर, जिल्हाप्रमुख राजू खुपसरे, सतीश धोबे, डॉ. खुजे, सुधा शिंदे, अंकुश नवघरे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद भटे, तालुकाप्रमुख विलास वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक वांदिले, नीता धोबे, महादेव बैलमारे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणात चंदनशिवे म्हणाले की, कोणताही राजकीय पक्ष असो किंवा नसो, त्याने महाराष्ट्र धर्माची मूल्ये जपली पाहिजेत. लोकांना आपलेसे वाटणारे, संवाद साधणारे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व समाजाला अपेक्षित आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजे कोणत्याही एका धर्माचा आग्रह नसून संवाद, सहिष्णुता, समता आणि माणुसकी जपण्याची जीवनपद्धती आहे. महाराष्ट्राला या विचारांचा विसर पडू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.समाजातील वाढत्या धार्मिक ध्रुवीकरणावर भाष्य करताना त्यांनी धार्मिक आडंबरांवरही टीका केली. जातीचे शिक्के आणि प्रमाणपत्रे देण्यापेक्षा प्रत्येकाला भारतीय असल्याचा अभिमान महत्त्वाचा आहे. धर्म आणि जातीच्या राजकारणाला युवकांनी नाकारत लोकशाही मूल्यांवरील आपला विश्वास कायम असल्याचे दाखवून दिल्याचे ते म्हणाले.

शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य करताना त्यांनी स्पर्धा परीक्षा आणि ‘नीट’ परीक्षेचा संदर्भ दिला. “पेपर फुटत नाही, तर विद्यार्थ्यांचे काळीज फाटते. त्यांच्या स्वप्नांचा खून होत आहे,” अशा शब्दांत त्यांनी परीक्षा व्यवस्थेवर टीका केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. देशासमोरील सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक आव्हानांवर मात करण्यासाठी महाराष्ट्र धर्माची विचारधारा पुन्हा समाजात रुजविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

उद्घाटनप्रसंगी माजी राज्यमंत्री अशोक शिंदे म्हणाले की, समाजात जाण आणि जाणीव निर्माण करण्यासाठी अनेकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, हे देशाचे दुर्दैव आहे. समाजपरिवर्तनासाठी हिम्मत, जिज्ञासा आणि विचारांची बांधिलकी आवश्यक असून ही ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. त्यांनी समाजात सातत्याने विचारांची पेरणी करण्याचे काम केले आहे.

“मातीशी नाळ जोडलेली पिढीच समाजाचे प्रश्न समजू शकते. सामाजिक व्यवस्था टिकवून ठेवायची असेल, तर महाराष्ट्र धर्म जागविणे ही काळाची गरज आहे,” असे सांगत त्यांनी समता, संवाद, सहिष्णुता आणि परस्पर विश्वास वाढविण्यासाठी महाराष्ट्र धर्माची मूल्ये अधिक व्यापकपणे समाजात रुजविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाप्रमुख प्रमोद भटे यांनी केले. युवा सेना विस्तारक शुभम सोरते यांनी सूत्रसंचालन केले, तर तालुकाप्रमुख विलास वैद्य यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंकुश नवघरे, वैभव मगर, निलेश कठाणे, महादेव बैलमारे, ताराचंद भोयर, प्रकाश चंदनखेडे, युवराज ढाले, नितीन थुटे, प्रितम शिंदे, प्रमोद चौखे, महादेव लांभाडे, कवडूजी मांडवकर, गोविंदराव कुबडे, अमरसिंह अकाली, साहेबराव शिवणकर, चेतन दुंडापूरे, गोविंद रंदई, गजानन कुटे, संजय वैद्य, विठ्ठल रोकडे, मनोहर हिवरकर, प्रशांत धोबे, गणेश झाडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *