ग्रामविकास

मोहगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचा तिढा सुटला; आमदार कुणावारांनी दिला २४ लाखांचा निधी


 मोहगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचा तिढा सुटला; आमदार कुणावारांनी दिला २४ लाखांचा निधी

समुद्रपूर तालुक्यातील मोहगाव परिसरातील मुख्य रस्त्याची दीर्घकाळची समस्या अखेर मार्गी लागली आहे. अत्यंत खराब झालेल्या या रस्त्यामुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या प्रश्नाची दखल घेत समिर कुणावार यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून २४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

या रस्त्याची दुरवस्था तत्कालीन सरपंच विलास नवघरे यांनी आमदार कुणावार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. मागणी मिळताच आमदारांनी तातडीने पाठपुरावा करत निधी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या कामाचे भूमिपूजन २२ नोव्हेंबर रोजी आमदार कुणावार यांच्या मार्गदर्शनाखाली, विलास नवघरे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले.

स्वातंत्र्यानंतर बराच काळ मागास राहिलेल्या मोहगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मोहगाव, तावी, रासा, केसलापार आणि वानरचुवा या गावांच्या विकासासाठी आमदार कुणावार यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. पाणीपुरवठा योजना, डांबरी व सिमेंट रस्ते, शिवार रस्ते तसेच इमारत बांधकामांसाठी गेल्या साडेतीन वर्षांत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून परिसरात पायाभूत सुविधांचा विकास झाला असून आता मुख्य रस्त्याच्या कामामुळे दळणवळण सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने वाहनचालकांचा त्रास कमी होणार असून अपघातांच्या घटनांनाही आळा बसणार आहे. या विकासकामांसाठी ग्रामस्थांच्या वतीने आमदार समिर कुणावार यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *