ग्रामविकास

ग्रामपंचायत निवडणुकांना विलंब : प्रशासक म्हणून सरपंचांची नेमणूक,


ग्रामपंचायत निवडणुकांना विलंब : प्रशासक म्हणून सरपंचांची नेमणूक,

गिरड : बातमीदार 

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रशासकीय अडचणींमुळे वेळेत पार पडू न शकल्याने, मुदत संपलेल्या तसेच २८ फेब्रुवारी २०२६ पूर्वी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या निर्णयानुसार, संबंधित ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंचाची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. ही नेमणूक सहा महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा ग्रामपंचायत रचनेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, यापैकी जो कालावधी आधी येईल तोपर्यंत लागू राहणार आहे.

ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालावे, विकासकामे व प्रशासकीय निर्णयांमध्ये अडथळा येऊ नये यासाठी विद्यमान उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती प्रशासकास मदत करणार असून, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ आणि त्याअंतर्गत नियमांनुसार सर्व अधिकार व कर्तव्ये बजावणार आहे.

या संदर्भात ग्रामविकास विभागाने यापूर्वी २३ जानेवारी २०२६ रोजी निर्गमित केलेले आदेश रद्द करण्यात आले असून, नव्या अधिसूचनेनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत सुरू राहणार असून, ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रशासकीय व विकासात्मक कामांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *