सामाजिक

मोहगाव ग्रामपंचायतीत शिवजयंतीचा उत्सव; बालचिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग


मोहगाव ग्रामपंचायतीत शिवजयंतीचा उत्सव; बालचिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग

गिरड : मोहगाव ग्रामपंचायत कार्यालयात रयतेचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास ग्रामस्थांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच विलास नवघरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल धोटे, ग्रामसेवक अखिल ढोबळे, आशा सेविका अर्चनाताई ओरके, अंगणवाडी सेविका छायाताई हाडके आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी सरपंच विलास नवघरे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते, तर ते उत्तम प्रशासक, लोककल्याणकारी राजा आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी झटणारे दूरदर्शी नेतृत्व होते. त्यांच्या स्वराज्याची संकल्पना आजच्या पिढीने आत्मसात केली पाहिजे. लहान वयातच शिवरायांचे विचार संस्काररूपाने रुजवणे ही काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

याचप्रमाणे अंगणवाडी सेविका छायाताई हाडके व आशा सेविका अर्चनाताई ओरके यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. महाराजांचे शौर्य, न्यायप्रियता, स्त्री-सन्मान आणि सर्वधर्मसमभाव या गुणांविषयी त्यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे अंगणवाडीतील चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग. लहानग्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत वातावरण भारावून टाकले. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमास वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी अरुण ठाकरे व दौलत शाहरे यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांचे सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त केली.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *