अपघात

ट्रकच्या धडकेत कार चिरडली; दैव बलवत्तर म्हणून दोघेही सुखरूप : राष्ट्रीय महामार्गावरील वाघाडी नदीच्या पुलावरील दुर्घटना


ट्रकच्या धडकेत कार चिरडली; दैव बलवत्तर म्हणून दोघेही सुखरूप : राष्ट्रीय महामार्गावरील वाघाडी नदीच्या पुलावरील दुर्घटना

 

समुद्रपूर, ता. प्रतिनिधी —

नागपूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील शेडगाव चौकाजवळ वाघाडी नदीच्या पुलावर गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिल्याने कार ट्रक व पुलाच्या कठड्यामध्ये चिरडली गेली. मात्र दैव बलवत्तर म्हणून कारमधील दोघेही प्रवासी कोणतीही इजा न होता बचावले.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील प्रमोद शांतीलाल बोरा व पवन प्रकाश संचेती हे दोघे एमएच ३१ एफई ४१४८ क्रमांकाच्या ब्रेझा कारने नागपूरकडे जात होते. सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास वाघाडी नदीच्या पुलावर एचएच ४० सीएम ५६०८ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या कारला मागून धडक दिली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला असून दोघेही कारमध्ये अडकून पडले होते.

घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलीस व महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले. पोलिसांनी कारमध्ये अडकलेल्या दोघांना सुरक्षित बाहेर काढले. एवढ्या मोठ्या अपघातानंतरही कोणतीही दुखापत न झाल्याने घटनास्थळी उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले.

अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, अतिगंभीर रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेस ठाणेदार रविंद्र रेवतकर यांनी विरुद्ध दिशेने मार्ग करून दिला. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

या घटनेची नोंद समुद्रपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *