गिरड ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
गिरड ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

समुद्रपूर: तालुक्यातील गिरड ग्रामपंचायत कार्यालयात आणि शिवाजी चौकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच राजू नौकरकर होते. यावेळी माजी उपसरपंच मंगेश गिरडे, ग्रामविकास अधिकारी प्रविण बालमवार, माजी जिल्हा परिषद सदस्य फकीरा खडसे, माजी पंचायत समिती सदस्य शेख ईस्राईल, माजी सरपंच विजय तडस, विलास नवघरे, कृषी सेवक रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बाजार चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमात बोलताना माजी सरपंच राजू नौकरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा उल्लेख केला. बारा बलुतेदारांना एकत्र आणून महाराजांनी स्वराज्याची पायाभरणी केली. सामाजिक समता, न्याय आणि लोककल्याण ही मूल्ये त्यांनी आचरणात आणली, असे त्यांनी सांगितले.
माजी जिल्हा परिषद सदस्य फकीरा खडसे यांनी महाराजांचे प्रशासन कौशल्य, युद्धनीती आणि रयतेबद्दलची कणव यावर प्रकाश टाकला. ग्रामविकास अधिकारी प्रविण बालमवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांचे विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमास गजानन वैद्य, अशोक डेकाटे, राकेश दिश्रीत, बाळू झाडे, चंदू पंढरे, शंकर महाकाळकर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला.






