ताज्या घडामोडी

प्रस्तावित शेती कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी माहिती सादर करावी  


प्रस्तावित शेती कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी माहिती सादर करावी  

वर्धा, : राज्य शासनाने 30 ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील शेती कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव केला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जवळच्या शाखेत किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आपला आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व फार्मर आयडी क्रमांक उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या 30 ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँका, स्मॉल फायनान्स बँका तसेच खाजगी बँकांकडून पीक कर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज व दीर्घ मुदतीचे कर्ज घेतलेल्या नियमित परतफेड करणाऱ्या तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही माहिती संकलित करण्यासाठी महाआयटी स्तरावर पोर्टल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, सदर पोर्टलवर विहित नमुन्यात माहिती सादर करावयाची आहे.

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न सर्व विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सुमारे 21 हजार नियमित तसेच थकीत शेती कर्जदार सभासदांचा यात समावेश आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन 2013 पासून कर्ज वाटप बंद असल्याने बँकेकडे सर्व कर्जदार शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण आहे. त्यामुळे भविष्यात या शेतकऱ्यांना प्रस्तावित शेती कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शेती कर्जाबाबतची माहिती संकलित करणे आवश्यक आहे.

या अनुषंगाने शेतकऱ्यांचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक व फार्मर आयडीची माहिती आवश्यक असून, ती संबंधित बँकेत सादर करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *