स्वच्छतेकडे एक पाऊल : मोहगाव ग्रामपंचायतीचा बकेट वितरण उपक्रम
स्वच्छतेकडे एक पाऊल : मोहगाव ग्रामपंचायतीचा बकेट वितरण उपक्रम

समुद्रपूर : तालुक्यातील मोहगाव ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. सरपंच विलास नवघरे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना घरगुती पातळीवर ओला व सुका कचरा वेगळा साठवता यावा, यासाठी कचरा साठवणूक बकेटचे वितरण करण्यात आले.
मोहगाव ग्रामपंचायत हद्दीतील पाच गावांमध्ये यापूर्वीच घनकचरा व्यवस्थापनासाठी टाके तसेच फॅब्रिकेटेड शेडचे बांधकाम करण्यात आले आहे. या सुविधांचा योग्य वापर व्हावा व गाव स्वच्छतेत सातत्य राहावे, यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृतीसह प्रत्यक्ष बकेट वितरणाचा उपक्रम राबविण्यात आला.
याअंतर्गत यापूर्वी काही नागरिकांना ओला व सुका कचरा साठवणुकीसाठी बकेट देण्यात आले होते. मात्र काही कुटुंबे या योजनेपासून वंचित राहिल्याची बाब लक्षात येताच सरपंच विलास नवघरे यांनी तात्काळ दखल घेत उर्वरित नागरिकांनाही बकेट वितरणाचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या वतीने पुन्हा एकदा वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास उपसरपंच सपनाताई बाभडे, ग्रामसेवक अखिल ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य जगदीश महातळे, संदीप दातारकर, राजू परचाके, प्रणाली वांढरे, सुनिता वाघाडे, बेबीताई आत्राम, शिलाताई धारणे यांची उपस्थिती होती. तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल धोटे, खुशाल शेडके, अरुण ठाकरे आदी मान्यवरही उपस्थित होते.
यावेळी नागरिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. घरातील कचरा योग्य पद्धतीने वर्गीकरण केल्यास गाव स्वच्छ राहण्यास मदत होते, आजारांचे प्रमाण कमी होते तसेच पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागतो, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या उपक्रमामुळे मोहगाव ग्रामपंचायत क्षेत्रात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होऊन स्वच्छ व सुंदर गाव घडवण्यास निश्चितच मदत होणार आहे.






