जिल्ह्यात इंधनसाठा पर्याप्त; अफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी वान्मथी सी
जिल्ह्यात इंधनसाठा पर्याप्त; अफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी वान्मथी सी

वर्धा, दि. २५ :प्रतिनिधी
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा काही ठिकाणी पसरत आहेत. या अफवांमुळे वाहनधारकांमध्ये घबराट निर्माण होऊन पेट्रोलपंपांवर अनावश्यक गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले की, वर्धा जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पर्याप्त साठा उपलब्ध असून इंधनपुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपांवर वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाईघाईने इंधन भरण्यासाठी पंपांवर गर्दी करू नये किंवा अनावश्यक साठा करू नये, असे त्यांनी सांगितले.
प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप चालक, विक्री अधिकारी व संबंधित प्रतिनिधींना इंधनपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. ऑईल कंपन्यांशी समन्वय साधून नियमित पुरवठा सुनिश्चित केला जात आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच, चुकीच्या अफवा किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे व अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






