४५ हजार किलोमीटर होणार पांदण रस्ते, आमदार कुणावार यांनी घेतला आढावा, वस्तुनिष्ठ व प्राधान्यक्रमाने यादी तयार करण्याचे आदेश
४५ हजार किलोमीटर होणार पांदण रस्ते, आमदार कुणावार यांनी घेतला आढावा, वस्तुनिष्ठ व प्राधान्यक्रमाने यादी तयार करण्याचे आदेश

हिंगणघाट | प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद/रस्ते योजना’अंतर्गत मार्च २०२६ पर्यंत राज्यात तब्बल ४५ हजार किलोमीटर पांदण रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हिंगणघाट येथे उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक पार पडली.
हिंगणघाट येथील या बैठकीत आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीत योजनेच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी विधानसभा क्षेत्रातील सर्व पात्र पांदण (शेत पाणंद) रस्त्यांची अद्ययावत, वस्तुनिष्ठ व प्राधान्यक्रमानुसार यादी तातडीने तयार करून सादर करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार कुणावार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी तसेच शेतीमाल वाहतुकीसाठी भक्कम व बारमाही रस्ते उपलब्ध व्हावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतरस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करणे, वाहतूक सुलभ करणे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाचवणे, यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्नवाढीस चालना मिळणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. पूर्वी रोहयो अंतर्गत मजुरांमार्फत केली जाणारी कामे आता यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने अधिक गतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जाणार आहेत.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या असून आमदार कुणावार हे विधिमंडळातील समितीचे सदस्य म्हणून कार्य करीत आहेत. समितीत पाच प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश असल्याने स्थानिक गरजा व प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन केले जात आहे. तसेच रस्ते मजबुतीकरणासाठी लागणाऱ्या मुरूम, दगड व मातीवर कोणतेही स्वामित्व धन (रॉयल्टी) आकारले जाणार नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.






