ताज्या घडामोडी

खुर्सापार–गिरड जंगलातील वाघ ‘गायब’ ..! वाघांचे कुटुंब विखुरले, वेगवेगळ्या दिशेने स्थलांतर


खुर्सापार–गिरड जंगलातील वाघ ‘गायब’
वाघांचे कुटुंब विखुरले, वेगवेगळ्या दिशेने स्थलांतर
निर्भीड लोकक्रांती / वृत्तसेवा
गिरड–खुर्सापार जंगल परिसरात एकत्र वास्तव्य करणारे वाघांचे कुटुंब आता पूर्णतः विखुरले असून वाघ वेगवेगळ्या दिशेने स्थलांतर करीत असल्याने गिरड–खुर्सापार जंगलातील वाघ ‘गायब’ झाल्याची भावना परिसरात निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी नियमित दर्शन देणारे वाघ आता अचानक दिसेनासे झाल्याने स्थानिक नागरिकात संभ्रमाचे वातावरण आहे.
दुसरीकडे कोरा–पवनगाव शिवार परिसरात सध्या तीन वाघांचे वास्तव्य आढळून आले असून या भागात वाघांचा धुमाकूळ सुरू असल्याचे चित्र आहे. प्राथमिक माहितीनुसार हे वाघ ताडोबा जंगलातून स्थलांतर करून या भागात दाखल झाल्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी जंगल क्षेत्राबाहेरही वाघांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावत आहे.कोरा भागात लाल नाला प्रकल्पामुळे पाण्याची मुबलकता असून जंगल क्षेत्र आणि नदी नाल्याच्या कडेला वाघांचे वास्तव्य आहे.
गिरड–खुर्सापार जंगलात यापूर्वी एकूण पाच वाघांचे वास्तव्य होते. अधूनमधून मानवी वस्ती व शेतशिवारात वाघांचा मुक्त संचार वाढल्याने शेजारचे गावे भीतीच्या छायेखाली आली होती. वारंवार होणाऱ्या वाघ दर्शनामुळे नागरिकांनी वनविभागाकडे वाघांना जेरबंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाने कारवाई करत पाचही वाघांना जेरबंद करण्याचा आदेश दिला.
या कारवाईत समवयस्क दोन वाघांना जेरबंद करण्यात वनविभागाच्या चमूला यश आले आहे. मात्र उर्वरित तीन वाघ अद्याप मुक्त संचार करीत असून त्यामध्ये एक वाघीण, एक पट्टेदार वाघ आणि एका शावकाचा समावेश आहे. सध्या हे वाघ जंगल क्षेत्र सोडून इतरत्र भटकंती करीत असल्याने गिरड–खुर्सापार जंगलातील वाघ ‘गायब’ झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
गिरड सहवन परिक्षेत्रात आतापर्यंत तब्बल ६७ जनावरांवर हल्ल्याच्या घटनांची नोंद वनविभागाकडे झाली आहे. गेल्या महिन्यापासून सुमारे ५५ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक वाघांच्या मागावर असून लवकरच आणखी एका वाघाला जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. सध्या वाघांच्या वास्तव्याच्या ठिकाणी कॅमेरे लावून निगराणी , निरीक्षण केल्या जात आहे.
कोणत्याही गावाशेजारी वाघाचे वास्तव्य आढळून आल्यास तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि नागरिकांनी स्वतःहून कोणतीही धोकादायक कृती करू नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी केले आहे. वाघांचे स्थलांतर ही केवळ वन्यजीवांची हालचाल नसून ती संपूर्ण परिसंस्थेच्या बदलत्या संतुलनाचे द्योतक असल्याचे मतही पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *