दसोड्याच्या जंगलात वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू , नैसर्गिक मृत्यूचा प्राथमिक अंदाज; अवघ्या एक महिन्याचा होता बछडा
दसोड्याच्या जंगलात वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू
नैसर्गिक मृत्यूचा प्राथमिक अंदाज; अवघ्या एक महिन्याचा होता बछडा

समुद्रपूर / प्रतिनिधी
समुद्रपूर तालुक्यातील मंगरूळ सहवनक्षेत्रातील मौजा दसोडा येथील संरक्षित वन क्षेत्रात अवघ्या एक महिन्याच्या पट्टेदार वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना ३० जानेवारी रोजी उघडकीस आली. दसोडा येथील संरक्षित वन कक्ष क्रमांक २७२ मध्ये नियमित गस्तीदरम्यान वनरक्षकांना बछड्याचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. निलेश गावंडे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले. त्यानंतर उपवनसंरक्षक वर्धा श्री. हरविरसिंग, सहाय्यक वनसंरक्षक श्री. सरोदे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) चे प्रतिनिधी श्री. ए. बी. गिरी, मानद वन्यजीव रक्षक वर्धा श्री. संजय इंगळे (तिगावकर) तसेच ‘पीपल फॉर अॅनिमल’ वर्धाचे प्रतिनिधी श्री. ऋषिकेश गोदसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी श्री. डी. के. बारापात्रे, डॉ. ज्योती चव्हाण व श्री. अरुण तुराळे यांनी सर्व वनअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाघ बछड्याचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालानुसार बछड्याचे वय अंदाजे एक ते सव्वा महिना असून लिंग मादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिक तपासणीत मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाघ बछड्याच्या मृतदेहावर विधीपूर्वक अग्नीसंस्कार करण्यात आले. ही संपूर्ण कार्यवाही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार पाडण्यात आली.
ही कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. निलेश गावंडे, वनपाल श्री. मडवे व वनरक्षक श्री. पिसे यांनी उपवनसंरक्षक श्री. हरविरसिंग व सहाय्यक वनसंरक्षक श्री. सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली.

दरम्यान, समुद्रपूर तालुक्यातील हे वनपरिक्षेत्र अत्यंत मोठे व घनदाट असून, येथे वाघांचा अधिवास वाढताना दिसत आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील काही वाघ कुटुंबे ताडगाव ते शिवणफळ या सुमारे २० किलोमीटर अंतराच्या जंगल क्षेत्रात वास्तव्यास येत आहेत. त्यामुळे या भागातील वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी संरक्षण उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच या जंगल क्षेत्राला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाशी जोडण्यात यावे, अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून करण्यात येत आहे.






