महत्त्वाचे

बुटीबोरी ते हिंगणघाट मेट्रो विस्ताराची मागणी : अतुल वांदिले यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन


बुटीबोरी ते हिंगणघाट मेट्रो विस्ताराची मागणी : अतुल वांदिले यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन

हिंगणघाट | प्रतिनिधी

बुटीबोरीपर्यंत सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा विस्तार जाम चौक मार्गे हिंगणघाटपर्यंत करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांच्यामार्फत निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बुटीबोरीपर्यंत मेट्रो प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून हा प्रकल्प लोकहिताचा आणि स्तुत्य आहे. हिंगणघाट हे वर्धा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून येथे राज्यस्तरीय मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे. या भागातून दररोज शेतकरी, उद्योजक, बेरोजगार युवक व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने नागपूरकडे प्रवास करतात.

मेट्रो रेल्वे सेवेचा विस्तार हिंगणघाटपर्यंत झाल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी ये-जा सुलभ होईल, तसेच सामान्य नागरिकांचा वेळ आणि प्रवास खर्चात मोठी बचत होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सध्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून अपघातांचे प्रमाण आणि प्रदूषणात वाढ होत आहे. मेट्रो सेवा सुरू झाल्यास वाहतुकीवरील ताण कमी होऊन पर्यावरण संरक्षणास मदत होईल. यासोबतच स्थानिक उद्योगधंद्यांना चालना मिळून परिसराचा सर्वांगीण विकास साधता येईल, असे मत अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.

मेट्रो सेवा हिंगणघाटपर्यंत सुरू झाल्यास चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनाही त्याचा थेट लाभ होणार असल्याचेही निवेदनात नमूद आहे. या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *