महामार्गावर पेट्रोलिंगदरम्यान चोरीची कार जप्त, संशयित ताब्यात
महामार्गावर पेट्रोलिंगदरम्यान चोरीची कार जप्त, संशयित ताब्यात
समुद्रपूर/ प्रतिनिधी : वरोरा पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली स्वीफ्ट डिझायर कार महामार्गावरील पेट्रोलिंगदरम्यान जाम पोलीस केंद्राच्या पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतली. ही कार हैदराबादच्या दिशेने जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर संशयास्पद अवस्थेत आढळून आली.

दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी प्रभाकर येरणे (रा. खांबाडा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) यांनी त्यांची स्वीफ्ट डिझायर कार (क्र. MH46 Z 9416) व कारमध्ये असलेली ६० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची तक्रार वरोरा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी अप.क्र. ५८/२०२६, कलम ३१६(२) बीएनएस अन्वये गुन्हा नोंद आहे.
आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी जाम पोलीस केंद्राचे अधिकारी व अंमलदार महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना नंबर प्लेट नसलेली संशयित कार दिसून आली. वाहन थांबविण्याचा इशारा दिला असता चालकाने वाहन न थांबविता पळ काढला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून मौजा आजंती शिवर येथे नाकाबंदी करत सदर वाहन व चालकास ताब्यात घेतले.

तपासादरम्यान चालकाने आपले नाव प्रमोद अजाबराव मडावी (वय ४०, रा. पाटनबोरी, ता. केळापूर, जि. यवतमाळ) असे सांगितले. वाहनाची तपासणी केली असता कारमध्ये MH46 Z 9416 क्रमांकाच्या दोन नंबर प्लेट आढळून आल्या. यावरून सदर वाहन चोरीचे असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर आरोपी व जप्त केलेली कार पुढील तपासासाठी वरोरा पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक झांबरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
ही कारवाई जाम पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी दिलीप थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रमोद धोटे, विकास काकडे, रंजीत फाले, चंद्रकांत जिवतोडे, सतीश नैताम, भूषण टोंग व आरती हुरले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.






