राजकीय

विकासाचं गाजर दाखवून जनतेची फसवणूक – अतुल वांदिले


विकासाचं गाजर दाखवून जनतेची फसवणूक – अतुल वांदिले

राज्य व केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा विकासाच्या नावाखाली जनतेची सरळसरळ फसवणूक करणारा असून सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारा आहे, अशी तीव्र टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांची धुळफेक असून त्यातून सामान्य माणसाला दिलासा मिळण्याऐवजी महागाई, बेरोजगारी आणि विषमतेत भरच पडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अतुल वांदिले म्हणाले की, विकासाच्या नावावर बेरोजगार युवकांची दिशाभूल करण्यात येत आहे. रोजगारनिर्मितीबाबत ठोस उपाययोजना नसताना केवळ घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठीही हा अर्थसंकल्प निराशाजनक असून उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा आणि हमीभाव यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारने मौन पाळले आहे. त्यामुळे शेतकरी अधिक अडचणीत सापडणार आहेत.

सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारी महागाई रोखण्यासाठी कोणतीही प्रभावी तरतूद करण्यात आलेली नाही. उलटपक्षी, इंधन, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. याचा सर्वाधिक फटका झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बसणार असल्याचे वांदिले यांनी सांगितले.

हा अर्थसंकल्प श्रीमंतांना अधिक श्रीमंत करणारा असून गरिबांचे जीवनमान खालावणारा आहे. त्यामुळे जनतेने या दिखाऊ विकासाच्या घोषणांना बळी न पडता सरकारला जाब विचारावा, असे आवाहनही अतुल वांदिले यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *